नागपुरात परिचारिकांचे आंदोलन सुरु

नागपूर : २३ जून – नागपुरात परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील दोन दिवसांपासून दोन तास धरणे देत आंदोलन सुरू होते. पण मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात नागपूर मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहासमोर धरणे देत हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये नागपूर मेडिकल आणि मेयोच्या या दोन रुग्णालयातील ८०० पेक्षा अधिक परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
कोरोनाकाळात जीवाचे रान करून अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत नसल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहासमोर परिचरिकांनी विविध मागण्या दर्शवणारे फलक हातात घेऊन धरणे दिले.
यामध्ये 23 आणि 24 जून हे दोन दिवस पुर्णवेळ काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर 25 जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. आंदोलन असेच चिघळले तर आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यता आहे.
परिचरिकांना पदभरती, पदोन्नतीत, केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, कोविड काळात 7 दिवस कर्तव्य बजावल्यानंतर 3 दिवस विलगिकरण रजा देण्यात यावी, मृत परिचरिकांच्या कुटुंबीयांना विनाविलंब 50 लाख विमा रक्कम आणि इतर सर्व आर्थिक लाभ देण्यात यावे, तसेच मृत परिचरिकांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंप तत्वावर नोकरी देण्यात यावी. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, केंद्र शासनाप्रमाणे पदनामात बदल करण्यात यावे, सार्वजनिक आरोग्य विभागासाठी मंजूर करण्यात आलेले सेवा प्रवेश नियम हे अनेक परिचरिकांसाठी अन्यायकारक ठरत असून त्यात योग्य बदल करण्यात यावे, आदी मागण्या केल्या जाईल अशी मागणी महाराष्ट्र परिचारिका संघटनेचे नागपूरचे सचिव सायमन माडेवार यांनी दिली.

Leave a Reply