अमरावती : २३ जून – अंजनगाव सुर्जी शहरातील टाकरखेड रोडवरील सरस्वती नगर येथील एका घराला सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
प्रफुल रामकृष्ण आवारे यांच्या मालकीचे ते घर आहे. घरात कोणी नसताना आग लागली. आग इतकी भीषण होती की, आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. लाखों रुपयाचे नुकसान झाले. या आगीमुळे परिसरात धावपळ सुरू झाली होती. त्यांनतर तातडीने आगीची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली. घरातील सर्व सदस्य बाहेरगावी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, घरातील अन्न, धान्य, कपडे व इतर गरजू साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरातील रोख 1 लाख 65 हजार रुपये व 20 ग्रॅम सोने जळून खाक झाले अशी माहिती प्रफुल्ल आवारे यांनी दिली. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर नुकसानाची नेमकी माहिती समोर येणार आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.