गावात ३ वाघ आढळल्याने गावकऱ्यांत दहशत, दोघांना केले जखमी

चंद्रपूर : २३ जून – चंद्रपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून माणसांवर वाघांनी हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा गावात ३ वाघ आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी गावात पोहोचले. वाघांना जेरबंद करण्यासाठी ऑपरेशन हाती घेण्यात आले.
चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे ३ वाघ आढळून आल्यामुळे गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. गावकऱ्यांनी तातडीने याची माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सकाळपासून वाघांना पकडण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली पण या धुमश्चक्रीत वाघांनी ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ आणि एसटीपीएफ (STPF – special tiger protection force) चा जवान जखमी झाला आहे. चरणदास बनसोड (56) असं ग्रामस्थाचं तर सुनील गज्जलवार असं जखमी stpf जवानाचे नाव आहे.
आज सकाळी पळसगाव येथील गाव तलावाजवळ 3 वाघ असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लोकांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण वाघांनी गावकऱ्यांवरच हल्ला केला. यात एक गावकरी जखमी झाला. त्यानंतर स्थिती कंट्रोल करण्यासाठी आलेल्या STPF च्या जवानावर देखील वाघाने हल्ला करून जखमी केले. दुपारपासून वाघ त्याच तलावाजवळ आहे. स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे. अखेर मोठ्या हिंमतीने या वाघांना पुन्हा एकदा जंगला पिटाळून लावण्यात आले आहे.

Leave a Reply