संपादकीय संवाद – विरोधकांची आघाडी बनवून भाजपला पर्याय हे आज दिवास्वप्नच

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्टात चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आज दिल्ली मुक्कामी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे, देशात भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची जुळणी करायची हा त्यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र या बैठकीला देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचा सहभाग नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे भाजपला दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात पवारांच्या मांडिला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेनेही बैठकीला दांडी मारली आहे. त्याचबरोबर पवार गेल्या काही दिवसात ज्या प्रशांत किशोरांना भेटले त्यांनिही देशात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही, असा नकारार्थी सूर आळवला आहे.
हे सर्व बघता प्रथम ग्रासे मक्षिका पातं: अशी शंका घेण्यास निश्चितच वाव आहे. त्याचबरोबर ज्या काँग्रेसने या सर्व प्रकारापासून स्वतःला दूर ठेवले त्या काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधींनी गुरुवारी विरोधी पक्षांची वेगळी बैठक बोलावली आहे. त्यामुळे तर ही शंका जास्त गडद होते आहे.
विरोधी पक्ष एकत्र येऊन विद्यमान सत्ताधारी पक्षाला लढा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९७१, १९७७, १९८९ यावेळी असे प्रयोग झाले आहेत. नंतर २००४ आणि २००९ मध्येही संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाखाली हे प्रयोग झाले आहेत. मात्र हे सर्वच प्रयोग अल्पायुषी ठरले आहेत. तरीही पवार पुन्हा हा उठारेटा का करतात? असा प्रश्न साहजिकच चर्चिला जातो आहे.
शरद पवारांचे देशाचे पंतप्रधान होण्याचे दीर्घकालीन स्वप्न आहे, जर पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडली नसती तर २००४ मध्ये सोनिया गांधी बाजूला झाल्यावर कदाचित त्यांना संधी मिळू शकली असती. मात्र त्याहीवेळी त्यांची संधी हुकली. त्यांचा स्वतःचा पक्ष जिथे महाराष्ट्रातही स्वबळावर आपला मुख्यमंत्री बनवू शकत नाही आणि कायम उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानतो तो पक्ष देशात आपला पंतप्रधान बनवू शकणार नाही,हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळेच पवारांना अश्या विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या कसरती कराव्या लागतात.
हे सर्व मान्य केले तरी विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधी बहुमत मिळवू शकेल काय? हा खरा कळीचा मुद्दा आहे. जरी बहुमत मिळाले तरी उर्वरित सर्व विरोधी पक्ष पवारांना पंतप्रधान म्हणून मान्य करतील काय? हेदेखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे. कारण विरोधकांमध्ये पवारांसोबत नितीश कुमार,देवेगौडा, ममता बॅनर्जी, मायावती, मुलामसिंह आणि अखिलेश यादव,असे कितीतरी पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. हे सर्व पवारांना सहजासहजी पंतप्रधान होऊ देतील आणि होऊ दिले तरी फारकाळ टिकू देतील असे वाटत नाही.
आलेल्या बातम्या बघता काँग्रेस आणि भाजप सोडून तिसरी आघाडी बनवण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचे दिसते मात्र असे केल्यास फायदा भाजपचाच होणार आहे. कारण ठिकठिकाणी तिहेरी लढती होतील,आणि मतविभाजनाचा फायदा भाजप घेईल त्यातही अनेक ठिकाणी बंडखोरी होईल त्यामुळे मतविभाजनाची शक्यता अधिकच वाढणार आहे.
काँग्रेसला सोबत घेऊन विरोधकांची आघाडी हा तास व्यवहार्य पर्याय असू शकतो मात्र काँग्रेसचे विद्यमान नेतृत्व अनेकांना रुचणारे नाही. राहुल गांधी हे नेते म्हणून अनेकांना चालणार नाही. काँग्रेसला मात्र गांधी परिवाराशिवाय कोणताही पर्याय मान्य नसतो. त्यामुळे ही शक्यताही बाजूला टाकावी लागते.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता शरद पवारांचा हा प्रयोग म्हणजे नसती उठाठेव ठरू शकते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विरोधक मुळात वेगळे झाले हे भिन्न भिन्न विचारसरणी आणि मुद्दे घेऊन अश्या सर्वांना एकत्र आणणे आणि नंतर एकत्र निवडणूक लढवून देशात सत्ता स्थापन करणे हे आजतरी दिवास्वप्नच ठरणार आहे. हे आजतरी शरद पवारांनी याचे भान ठेवायला हवे इतकेच यावेळी सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply