संतप्त युवकाने पेटवले शेजाऱ्याचे कपडे, दुचाकी

अमरावती : २२ जून – खोलापूरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीची पत्नी घरातच लपली होती. मात्र, त्याला ती दिसली नाही. त्यामुळे या व्यक्तीला असा संशय आला, कि परिसरातच राहाणाऱ्या एका युवकासोबत आपली पत्नी फरार झाली आहे. यानंतर त्यानं जे काही केलं ते धक्कादायक होतं. हा व्यक्ती संशयित युवकाच्या घरी गेला. यानंतर त्यानं संबंधित युवकाची दुचाकी पेटवली, इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानं त्याचे कपडेसुद्धा जाळले.
ही घटना 20 जून रोजी सायंकाळी महाजनपुरा परिसरात घडली आहे. महाजनपुरा इथे राहाणाऱ्या एका व्यक्तीला आपली पत्नी घरामध्ये दिसली नाही. यानंतर परिसरातच राहाणाऱ्या एका युवकावर त्याला संशय आला. यानंतर महिलेच्या पतीनं या युवकाचं घर गाठलं. तो घरी गेला तेव्हा युवक घरामध्ये नसल्यानं त्याचा संशय आणखीच बळावला. महिलेच्या पतीनं संबंधित युवकाच्या आईकडे तो कुठे गेला आहे, याबाबत विचारपूस केली. नंतर त्यानं स्वतःच असे आरोप केले, की तुझा मुलगा माझ्या बायकोला घेऊन पळून गेला आहे. इतकंच नाही तर महिलेच्या पतीनं युवकाची दुचाकीही पेटवून दिली. यानंतर युवकाच्या घरातील साहित्याची मोडतोड करत त्यानं युवकाचे कपडे घराबाहेर आणत पेटवून दिले.
या सर्व प्रकारादरम्यान संबंधित युवकाचे काका महिलेच्या पतीला समजविण्यासाठी आले असता त्यानं त्यांनाही शिवीगाळ करत धमकी दिली. यानंतर युवकाच्या आईनं जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांच तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता असं समोर आलं, की जाळपोळ करणाऱ्या व्यक्तीची पत्नी त्याच्याच घरामध्ये लपून बसलेली होती. मात्र, ती घरात न दिसल्यानं पतीला संशय आला, की ती परिसरातील युवकासोबत पळून गेली आहे. याच कारणामुळे त्यानं युवकाच्या घरी जात जाळपोळ केली. याप्रकरणी महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply