विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत – विजय वडेट्टीवार

गडचिरोली जिल्ह्यात विद्यापीठ असून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे राज्याचे बहूजन कल्याण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विद्यापीठामध्ये सध्या मोठया प्रमाणात विस्ताराची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक युवकांना समोर ठेवून त्यांच्यामध्ये कौशल्य वाढ होण्यासाठी त्यांना कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमही निवडता येईल त्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरू करा, त्यासाठी प्रस्ताव सादर करा असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कौशल्य विकासावर आधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम व विद्यापीठाचे इतर अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यास स्थानिक गुणवत्तेला वाव देता येईल. तसेच जिल्ह्यातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापरही करता येईल असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
कौशल्यावर आधारित प्रस्ताव शासनास सादर केल्यानंतर त्यासाठी मंजूर निधी वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. कौशल्य विकासावर भर देण्यासाठी, प्रस्ताव मंजूरीसाठी मंत्रालयस्तरावर एक दिवसाच्या बैठकीचे आयोजन करू असे ते म्हणाले, कौशल्य विकासाबाबत जिल्ह्यातील प्रश्नांबाबत त्या दिवशी चर्चा करू. यात पालकमंत्री, संबंधित मंत्री, सचिव, जिल्हा प्रशासन सहभागी असेल. याबैठकीतून नक्कीच प्रलंबित व नियोजित कौशल्य विकास योजना मार्गी लावू असे ते यावेळी म्हणाले.

विद्यापीठ अंतर्गत प्रस्तावित इंजिनिअरींग कॉलेजसाठी आवश्यक जागेवरही चर्चा करण्यात आली. याबाबत विविध प्रस्ताव येत आहेत. यातील बोदली येथील बंद असलेल्या इंजिनिअरींग कॉलेजचाही विचार करण्यात यावा असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचना केल्या.

Leave a Reply