चंद्रपूर : २२ जून – योगाला जागतिक स्तरावर पोहोचवून भारताने विश्वगुरूचा सन्मान प्रस्थापित केला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्य भाजपा चंद्रपूर महानगरच्या वतीने जोडदेऊळ वार्ड, संजय नगर, जगन्नाथबाबा मठ, माना टेकडी व अन्य परिसरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अहिर यांनी, विविध प्राचिन संस्कृती व उदात्त परंपरेच्या भारत देशाने योगविद्येचे संवर्धन व संरक्षण करून समाज कल्याणार्थ ही विद्या वापरली व त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात देशाच्या ऋषीमुनी व योगसाधक महान व्यक्तीमत्वांनी मोलाचे कार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योगाला सातासमुद्रापलीकडे पोहोचवित त्याचे महत्व जागतिक व्यासपीठावर प्रतिपादित केल्याने आज 175 हून अधिक देश जागतिक स्तरावर हा योग दिन साजरा करण्यास सिध्द झाले आहेत, असे सांगितले. देशावर कोरोनाचे संकट कोसळल्यानंतर अनेकांनी योगाच्या माध्यमातून आपले स्वास्थ्य व मनोबल वाढवून कोरोना रोगावर मात केली. हे वास्तव लक्षात घेवून प्रत्येकांनी योग दिनाचे पार्श्वाभूमीवर आपल्या दैनंदीन जिवनाचा भाग म्हणून योगाला अंगिकारावे व आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित राखावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी अहिर यांनी उपस्थित योग शिक्षकांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला.
या योगदिन सोहळ्यामध्ये माजी महापौर अंजली घोटेकर, नगरसेविका संगीता खांडेकर, राजू घरोटे, विनोद शेरकी, रमेश भुते, वासुदेव भुते, मिलिंद गंपावार आदींसह पतंजली योग समिती, गुरूदेव सेवा मंडळ व अन्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात योग विद्येचे धडे घेतले.