अकोल्यात पालकमंत्र्यांनी वेषांतर करून दिल्या सरकारी कार्यालयांना भेटी

अकोला : २२ जून – अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी वेशांतर करून महापालिकेसह जिल्हय़ातील विविध कार्यालयांना भेटी देऊन झाडाझडती घेतली. वेशांतरामुळे अनेक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना ओळखलेच नाही, तर काहींना अंदाज आल्याने ते सावध होते. जिल्हय़ात गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यंत्रणेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी केलेल्या या दौऱ्यात चांगले व वाईट अनुभव आल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
जिल्हय़ातील शासकीय यंत्रणेच्या कामाचा गुप्तपणे आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू वेशांतर करून जिल्हय़ात दाखल झाले. काहींना त्यांच्या या दौऱ्यांची कुणकुण लागली होती. पालकमंत्र्यांनी मुस्लीम व्यक्तीचे वेशांतर करून मुखपट्टी लावली होती. घरकुलाच्या मुद्यावर प्रहारच्यावतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात बच्चू कडू स्वत: सहभागी झाले. यावेळी त्यांनी आयुक्तांना भेटण्यासाठी त्यांच्या स्वीय सहायकाकडे विनंती केली. मात्र, आयुक्त दुपारी ४ ते ५ दरम्यान भेटतील, असे उत्तर मिळाले. महापालिकेच्या विविध विभागांनाही त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पातूर शहराकडे वळवला. पातूर येथील पान केंद्रावर त्यांनी गुटखा मागितला. मोठय़ा प्रमाणात गुटखा पुरवण्याची तयारी पालकमंत्र्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी तहसील कार्यालयात जाऊन धान्य पत्रिका तयार करण्यासाठी खर्च करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यांना नियमाप्रमाणे कागदपत्रे आणा, तशी पत्रिका तयार होणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. पालकमंत्र्यांनी एका स्वस्त धान्य दुकानाला भेट देत तांदळाची मागणी केली. मात्र, दुकानदाराने आता ऑनलाईन व्यवस्था असल्याने अशाप्रकारे तांदूळ देण्यास असमर्थता दर्शवली. एका बँकेतही त्यांनी भेट दिली. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असल्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारे अवैधपणे गुटखा विक्री होत असेल, तर बंदीला अर्थ काय, असा सवालही त्यांनी केला. अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाच्या भ्रष्ट कारभारावर त्यांनी संताप व्यक्त केला.

Leave a Reply