संपादकीय संवाद – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गर्दी करता येते तर वारकऱ्यांना का नाही

गेल्या आठवड्यात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन झाले. त्यावेळी सभागृहात इतकी गर्दी झाली होती की उदघाटक उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात सांभाळून व्यासपीठावर आणावे लागले. नंतर माध्यमांनी विचारले असता, कार्यक्रमाच्या आयोजकांना सारवासारव करीत माफी मागितली. कार्यक्रम स्थळावरून निघतांना अजितदादा पवारांना माध्यमांनी याबाबत छेडले राज्यात कोरोनाची लाट आहे आपण सोशल डिस्टंसिंगचा आग्रह धरतो आहोत, अश्या परिस्थितीत हा सोशल डिस्टंसिंगचा फज्जा तुम्हाला मान्य आहे का? असे विचारल्यावर अजितदादांनी संबंधितांवर कारवाई करू असे आश्वासन दिले. त्यानुसार आयोजकांना गुन्हा दाखल करून अटक केल्याची बातमी आहे.
मुळातच कोरोनाच्या लाटीमुळे सर्वकाही जागीच थांबले आहे, कोरोना वाढू नये म्हणून सरकारने खूप सारे निर्बंध घातले आहेत. मधल्या काळात सर्व व्यवसाय बंद करावे लागले होते. अजूनही निर्बंध आहेतच लग्नात १०० व्यक्तींची मर्यादा आहे, तर अंत्यविधीसाठी फक्त २० जणांना जात येते, मंदिरही बंद आहेत, शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली पंढरपूरची वारी देखील यंदा सलग दुसऱ्या वर्षी होणार नाही. एकूणच कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन वेठीस ठरले गेले आहे.
विशेष असे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व राजकीय नेते सध्या जनसामान्यांना हे निर्बंध पाळण्याचा आग्रह करीत आहेत. निर्बंध न पाळल्यास कारवाईचा इशाराही दिला जातो आहे. अश्या परिस्थितीत राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात असे प्रकार होतात, आणि उपमुख्यमंत्री त्याला प्रतिबंधही करत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईत मेट्रोला हिरवी झेंडी दाखवण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याही उपस्थितीत असाच प्रकार घडला होता. हे सर्व बघता आमचे राजकीय नेते हे लोक सांगे ब्राम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण या तत्वाचेच पालन करतात काय? ही शंका घेण्यास निश्चितच वाव आहे.
आधी नमूद केल्याप्रमाणे यंदा लागोपाठ दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली आहे. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत वारी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी परिवाराने केली होती, मात्र राज्यशासनाने ती मागणी फेटाळली परिणामी यंदाही वारी आणि वारकरी विशेष एसटी बसनेच पंढरपूरला पोहोचणार आहे.
या संदर्भात पंचनामाच्या एका वाचकाने प्रश्न उपस्थित केला आहे, अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोंधळ घालतात आणि नंतर त्यांचे नेते माफी मागून मोकळे होतात, निमित्त काय तर कार्यालयाचे उदघाटन, हे उदघाटन १० व्यक्तींच्या उपस्थितीतही पार पाडता आले असते, गर्दीतच उदघाटन करावे अशी काही परंपरा नाही आणि जर कथित उदघाटनाची नियम मोडला जात असेल आणि माफी मागून सुटका होणार असेल,तर वारकर्यांनीही असेच करायला काय हरकत आहे. असे या वाचकाचे मत आहे.
सर्व ठिकाणाहून ५०-५० च्या गटाने दिंड्या काढाव्या पंढरपुरातही टप्प्याटप्प्यानेच दर्शनाला पोहोचावे आणि सरकारने कारवाई करतो म्हटले तर माफी मागून मोकळे व्हावे जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माफी मिळणार असेल तर वारकर्यांनाही माफी द्यावी, अशी या वाचकाची सूचना आहे.
या मुद्द्यावर सकारात्मक विचार करण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पांडुरंगानेच सद्बुद्धी द्यावी अशी आमची पांडुरंगचरणी विनवणी आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply