काश्मीरमध्ये लष्कराच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

श्रीनगर : २१ जून – जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक झाली. यावेळी भारतीय लष्कराने जबरदस्त कारवाई करत ‘लश्कर-ए-तोयबा’च्या एका कमांडरसह तीन दहशहतवाद्यांना कंठस्नान घातलं. जम्मू-काश्मीरमधील सोपोर परिसरातील गुंड ब्राथ भागात ही कारवाई करण्यात आली. यात कमांडर मुदसीर पंडितला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं असून, आणखी एका दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. तो मूळ पाकिस्तानचा असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
तीन पोलीस कर्मचारी, २ नगरसेवक आणि २ नागरिकांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या मुदसीर पंडित यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. काल (२० जून) रात्री जम्मू काश्मिरातील सोपोर परिसरात असलेल्या गुंड ब्राथ भागात लष्कराचे जवान आणि लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी यांच्यात चकमक उडाली.
लष्कराचे जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्यानंतर धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सुरक्षा जवानांना जोरदार कारवाई करत सुरूवातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. त्यानंतरही गोळीबार सुरूच राहिला. त्यानंतर जवानांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकूण तीन दहशतवादी या चकमकीत ठार झाले असून, लष्कराची शोध मोहीम सुरूच आहे.
सोपोरमधील गुंड ब्राथ येथे लष्कराच्या जवानांनी केलेल्या कारवाईची काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी माहिती दिली. “काश्मीरमध्ये तीन पोलीस कर्मचारी, दोन नगरसेवक आणि दोन नागरिकांच्या हत्येतमध्ये सहभाग असलेल्या कमांडर मुदसीर पंडित या कारवाई ठार झाला आहे. एकून तीन दहशतवादी या कारवाईत ठार झाले असून, आणखी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. तो मूळचा पाकिस्तानी असून, असरार उर्फ अब्दुल्ला असं त्यांचं नाव आहे. २०१८ पासून तो उत्तर काश्मिरात सक्रीय होता,” असं विजय कुमार यांनी सांगितलं.

Leave a Reply