उद्धवजींच्या मनात काय ते फक्त रश्मी वहिनींनाच माहित असत – चंद्रकांत पाटील

मुंबई : २१ जून – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर भाजपला आता शिवसेनेसोबतच्या युतीची आस लागल्याचं चित्र आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेसोबत युती होऊ शकते असं भाजप खासदार गिरीश बापट म्हणाले. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाष्य केलं आहे.
“प्रताप सरनाईक जे म्हणतात ते खरं आहे, पण त्यांच्या म्हणण्याने काही परिवर्तन होणार नाही, होत नाही. परिवर्तन उद्धवजींना वाटल्यानंतरच होणार आहे. आणि उद्धवजींना स्वतःला वाटेल की आता महाविकास आघडीमध्ये असह्य झालं आहे आणि रोज उठून चुकीच्या फाईलवर सह्या करण्याचं प्रेशर येत असतं, रोज उठून हिंदुत्वाशी तडजोड करावी लागते, तेव्हा त्यांच्या मनात येऊ शकतं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसंच परिवर्तनाची वेळ आलीय की नाही याबाबत उद्धवजींच्या डोक्यात काय चाललंय हे माहीत असेल तर ते केवळ रश्मी वहिनींना माहीत असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हाही प्रश्न आहे की उद्धवजींना लिहलेले पत्र लीक कसं होतं? की उद्या परिवर्तन आणायचं असेल तर त्याचं बॅकग्राऊंड तयार केली जात आहे?
का ते पत्र लिहून केंद्र कसं त्रास देत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे? असे प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केले.
ज्या तपास यंत्रणा घटनेने तयार केल्या आहेत, त्यावर अविश्वास दाखवणे योग्य नाही. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आयुष्यभर ज्यांना दोष दिला, शिव्या घातल्या, खड्यासारखं दूर ठेवले, त्यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं, त्या दिवसापासून ही खदखद होती. शिवसेनेमध्ये एक शिस्त आहे, जे म्हणायचं असेल ते उद्धव ठाकरेंना म्हणतील, बाहेर येऊन प्रेससमोर मांडणार नाही. पण त्या शिस्तीलाही एक अंत असतो, त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिलं . पण ते पत्र खासगी असूनही लीक झालं. सरकारी पत्र लीक होऊ शकतं. पण तुमच्या घरातलं पत्र कसं लीक होऊ शकतं? याचा अर्थ तुम्हाला आता आमदारांच्या मनातली खदखद बाहेर ऑन पेपर आणायची आहे. आणि त्यातून अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की आता सर्व आमदारांच्या मनोगताला मान देऊन, असं कदाचित बॅकग्राऊंड तयार करायचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमदारांच्या खदखदीला काही अर्थ नाही, जोपर्यंत उद्धव ठाकरे काही ठरवत नाहीत, तोपर्यंत काही होणार नाही. आमदारांच्या खदखदीला मान देऊन परिवर्तन करण्याची वेळ आली आहे की नाही हे उद्धवजींनाच माहीत, असंही चंद्रकात पाटील यांनी नमूद केलं.
उद्धवजींच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की, उद्धव ठाकरेंना काय म्हणायचं आहे ते त्यांच्या बॉडी लॅंग्वेजमधून फार कमी वेळा कळतं. ते काँग्रेससोबत जातील असं वाटलं नव्हतं. त्यांच्या मनात राग होता आणि ते सोबत गेले. आता तसं परिवर्तन करण्याची वेळ आली आहे की नाही, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे माहीत असेलच तर ते रश्मी वहिनींना माहीत असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply