सरनाईकांना विनाकारण कोण त्रास देत आहे ते शोधले पाहिजे – संजय राऊत

मुंबई : २० जून – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केल्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या पत्रावर प्रतिक्रिया देत ‘विनाकारण कोण त्रास देत आहे हे शोधलं पाहिजे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मोजक्यात शब्दांत आपली प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचे टाळलं.
‘सरनाईक यांनी मत मांडले त्यावर प्रतिक्रिया द्यावे, असं काय आहे. मुळात विनाकरण त्रास दिला जात आहे, असं ते म्हणतात विनाकरण कोण त्रास देतंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.
तसंच, या पत्रातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. विनाकारण महाविकास आघाडीतील नेत्यांना कोण त्रास देतंय याचा विचार केला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
‘गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र, आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत. अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एक विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली का? असा सवाल सरनाईक यांनी उपस्थितीत केला.

Leave a Reply