प्रताप सरनाईकांच्या पत्राने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारचे वितुष्ट येणार नाही – जयंत पाटील

सांगली : २० जून – बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही, असा दावा पाटील यांनी केलाय. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
“मला वाटत नाही की त्यांचा तो भाव असेल. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत कुणी गेलंय, असं आता काही झालेलं नाही. त्यामुळे अशापद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईलं असं मला वाटत नाही. ज्यांनी पत्र लिहिलं आहे, त्यांच्या मतदारसंघात असं काही झालं आहे का हे तपासून पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनापासून आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply