पक्षहितासाठी भाजपशी जुडवून घ्या – प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

ठाणे : २० जून – सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत व अर्णव गोस्वामी प्रकरणात आक्रमक भूमिका घेत भाजप व केंद्र सरकारवर बरसणारे शिवसेनेचे आमदार व ठाण्यातील वजनदार नेते प्रताप सरनाईक यांनी आता वेगळीच भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, असं साकडं सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातलं आहे. तसं पत्रच त्यांनी लिहिलं आहे.
सरनाईक यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी तब्बल दोन पानांचं पत्र लिहिलं आहे. सरनाईक यांच्या लेटरहेडवरील १० जूनचं हे पत्र एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीनं ट्वीट केलं आहे. ‘टॉप सेक्युरिटी’ प्रकरणात सरनाईक यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून ते या प्रकरणी कायदेशीर लढाई लढत आहेत. राज्यात सत्ता असतानाही या लढाईत सरकार वा अन्य नेत्यांचं सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

सरनाईक यांनी पत्रातून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं म्हणणं सरनाईक यांनी मांडलं आहे. युती तुटली तरी युतीतील नेत्यांचे वैयक्तिक संबंध व जिव्हाळा अजूनही कायम आहे. तो तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री व सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून केंद्राशी नकळत छुपी हातमिळवणी करताना दिसत आहेत. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. तसं झाल्यास निदान माझ्यासह अनिल परब आणि रवींद्र वायकर अशा इतर सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल,’ असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

‘गेल्या दीड वर्षात मी आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचीच कामे कशी झटपट होतात, आपला मुख्यमंत्री असतानाही आपली कामे का होत नाही? अशी त्यांची भावना आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे का? अशी चर्चा सुरू असल्याकडंही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

‘कोणताही गुन्हा नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल असलेल्या माजी खासदाराकडून बदनामी सुरू आहे. त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करताना आमच्या कुटुंबीयांवरही आघात होत आहे. एका प्रकरणातून सुटल्यानंतर जाणीवपूर्वक दुसऱ्या प्रकरणात गुंतवलं जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या प्रकरणात अडकवलं जात आहे.भाजपशी जुळवून घेतल्यास हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही त्यांनी मांडली आहे.

‘पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. युतीच्या नेत्यांमधील संबंध आणखी तुटण्याआधी पुन्हा जुळवून घ्यायला हवे. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगीर आहे, असंही सरनाईक यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

Leave a Reply