नागपूर : २० जून – मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांमध्ये शनिवारी मध्यरात्री राडा झाला. यात तीन जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने कारागृहात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजू मोहनलाल वर्मा व अन्य दोघे अशी जखमींची तर विवेक गुलाबराव पालटकर असे हल्लेखोराचे नाव आहे.
राजू व विवेक हे दोघेही खुनातील आरोपी आहेत. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या विवेक पालटकरनं कपडात दगड बांधून राजू याच्यावर हल्ला केला. राजू गंभीर जखमी झाला. त्याच्या मदतीसाठी दोन अन्य बंदीवान धावले. त्यांच्यावरही विवेक याने हल्ला केला. दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील अधिकारी तेथे पोहोचले. गंभीर जखमी याला कारागृहातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. विवेक याला वेगळ्या बराकीत ठेवले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी विवेक याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विवेक पालटकर यानं २०१८ साली पाच जणांची हत्या केली होती. विवेक पालटकरला पत्नीच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला सोडविण्यासाठी कमलाकर पवनकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एक वर्षापूर्वी उच्च न्यायालयाने विवेकची निर्दोष सुटका केली होती. त्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. विवेक याची नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. कमलाकर हे त्याच्याकडं पैसे मागत होते. पण शेती विकण्याची त्याची तयारी नव्हती. यावरून दोघांमध्ये आठ दिवसांपासून वाद सुरू होता. यातूनच विवेकनं कमलाकर यांच्यासह पाच जणांचा निर्घृण खून केला होता. तर, राजू वर्मा आणि त्याच्या साथीदारांनी भाजी विक्रेत्याचा खून केला होता. त्या प्रकरणांमध्ये हे सगळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.