यंदाही मानाच्या पालख्या एसटीनेच जाणार पंढरपूरला

मुंबई : १९ जून – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या पालख्यांना बसेसमधून जाण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार या दहाही पालख्यांसाठी एसटी बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. त्यामुळे आषाढी एकादशीला दहाही मानाच्या पालख्यांचा एसटीतून प्रवास होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. 19 जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांनाना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत, असं परब यांनी सांगितले.
या पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वारीपर्यंतचा प्रवास एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वारीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. मागील वर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल परब यांनी समाधान व्यक्त केले. वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची अशीच संधी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थनाही त्यांनी केली. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेसचं निर्जंतूकीकरण करण्यात येतील. तसेस प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply