मुंबई : १९ जून – शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजप आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ‘शिवप्रसाद’ काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर ‘प्रसाद’ दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल नक्की, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.
शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा आज 55 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे.
त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार आहे. तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.