४०० फूट खोल दरीत कार कोसळली, तरीही सर्व सुखरूप

सातारा : १८ जून – सातारा जिल्ह्यातील वाईहून पाचगणीला जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या कारला अपघात झाल्यानंतर हे कुटुंबीय मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. खरंतर ४०० फुट खोल दरीत कार कोसळूनही तिघंही सुखरूप बचावले आहेत. अपघात झाल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं आहे. कारमधील तिघेही सुखरूप असून त्यांना साधं खरचटलं देखील नाही. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांसाठी ही घटना चमत्कारपेक्षा कमी नव्हती.
संबंधित कुटुंबीय वैयक्तिक कामानिमित्त वाईला गेले होते. यानंतर ते पसरणी घाटातून पाचगणीला परत येत होते. दरम्यान त्यांच्या कारला पसरणी घाटात हा अपघात झाला. घाटातील 16 नंबरच्या बस स्टॉपजवळून जात असताना अचानक कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार थेट दरीत जाऊन कोसळली. कार वेगात असल्यानं संरक्षण भिंत ओलांडून कार दरीत पडली.
पण कार दरीत कोसळल्यानंतर काही फुट अंतरावर असणाऱ्या एका झाडावर कार अडकली. यामुळे कारमधील एक पुरुष आणि दोन महिला अशा तिघांचा जीव वाचला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचं किरकोळ नुकसान झालं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं अपघातग्रस्त कार दरीतून बाहेर काढली आहे. नशिब बलवत्तर म्हणून की काय तिघांचेही प्राण वाचले आहे.

Leave a Reply