राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना एका मंचावर आणणार – वडेट्टीवार

नागपूर : १८ जून – खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी मूकमोर्चा काढला. यावेळी सर्वपक्षीय मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना एकाच मंचावर आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना एकाच मंचावर आणण्यात येणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले आहे. लोणावळ्यात येत्या 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
ओबीसींच्या प्रश्नावर पक्षापलिकडे जाऊन गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. हे शिबिर बोलावण्यामागे कोणतंही राजकारण नाही किंवा कोणतीही राजकीय भूमिका नाही. तसे असते तर मी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावलं नसतं. मी कोणत्याही संघटनेत नाही. समाजाचा घटक आणि कार्यकर्ता म्हणून ओबीसी आरक्षणावर लढत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचं संकट असल्याने डेटा गोळा करणं कठिण आहे. त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. कोर्टाने केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत. तसेच कोरोना संकटात डेटा गोळा करता येईल का याबाबत कोर्टाचं मतही जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply