गडचिरोली : १८ जून – गडचिरोलीतील अहेरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या वेलंगूर ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवेगावात पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास या दाम्पत्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनार्दन कोटरंगे आणि पोचूबाई कोटरंगे असं या पती-पत्नीचं नाव आहे. हे दोघेही मजुरी करून आपलं पोट भरत होते. अंतर आज त्यांचे मृतदेह सापडले आहेत. जनार्दन हे लटकलेल्या अवस्थेत तर त्यांच्या पत्नीचा मृतदेह खाटेवर आढळून आला आहे. कोटरंगे दाम्पत्यानं आत्महत्या केली की ही हत्या आहे याबद्दल आता संशय व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी जनादर्न यांनी काही गावकऱ्यांकडून आपल्या गरजेसाठी सायकल घेतली होती. आज सकाळच्या सुमारास गावकरी सायकल परत घेण्यासाठी गेले असता त्यांना या दोघांचे मृतदेह दिसून आले. त्यामुळे गावात खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या मुलाला कळवण्यात आलं. पोलिसांकडून या घटनेबाबत चौकशी करण्यात येत आहे.