तेलंगणातील दोन गांजा तस्करांकडून ३० लाखाचा गांजा जप्त

चंद्रपूर : १८ जून – तेलंगणा राज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक त्यावर पाळत ठेऊन होते. सकाळच्या सुमारास राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अंदाजे ३० लाख रुपये किंमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. चंद्रकांत त्रिवेदी, सागर पाझारे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
विशेष म्हणजे, हा गांजा राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा शहरात वितरित केला जाणार होता, अशी माहिती अटकेतील व्यक्तींनी दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी याच परिसरात दोन कारवाया केल्या. त्यात पहिल्या कारवाईत 74 किलो, तर दुसर्या कारवाईत 8 किलो गांजा जप्तसुद्धा करण्यात आला. तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याने विशेष पथक नेमण्यात आले. हे पथक मागील चार दिवसांपासून या परिसरात ठाण मांडून होते. गुरूवारी सकाळच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीने गांजाची तस्करी केली जात होती. यावेळी या पथकाने वाहने थांबवून तपासणी केली असता, दुचाकी वाहनावरील दोन चुंगड्यात गांजा आढळून आला. तर, चारचाकी वाहनातील ट्युबलेस टायरमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला. यावेळी अन्य दोघे सुमारे 10 किलो गांजा घेऊन पसार झाले.
आरोपीविरूद्ध राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात गांजा तस्करी करणार्यांविरोधात विशेष मोहीम राबविली जात असल्याची माहिती खाडे यांनी दिली.

Leave a Reply