वर्धा : १८ जून – केंद्र शासनाने रस्ते व पूलांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने वर्धा जिल्हय़ाच्या विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्ता येथील उड्डाण पुलाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महामार्गावरील शेडगाव चौरस्ता येथे ४७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांनी यावेळी केले. या निमित्याने बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी भूमिका मांडली. खा. रामदास तडस, खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, रामदास आंबटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्धा जिल्हय़ाच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून कोटय़वधीचा निधी देण्यात आला. त्यातून प्रामुख्याने शहरी भागासह ग्रामीण भागात रस्ते व पुलांची बांधकामे झाली. महामार्गाच्या निर्मितीमुळे दूरचा प्रवास सुखद झाला. ग्रामीण जनतेला सुविधा प्राप्त झाल्याने शेती विकासाला गती मिळाल्याचे गडकरी यांनी विविध कामाचा आढावा घेत नमूद केले. हिंगणघाट बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करताना गडकरी म्हणाले की, शीतगृहाचे बांधकाम करण्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल, बाजार समितीने योगदान दिल्यास हिंगणघाट येथे रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांना गडकरी यांनी दिले. आ. कुणावार यांच्या मागणीची दखल घेत वणा नदीच्या खोलीकरणाचे काम लवकरच सुरू करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात प्राणवायू प्रकल्पाची निर्मिती सुरू झाल्याने तिसऱ्या लाटेत प्राणवायूची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. आ. कुणावार यांनी आपल्या भाषणातून हिंगणघाटच्या विविध समस्यांवर लक्ष वेधले. प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी व संचालन रेणुका देशकर यांनी केले.