सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटा – उदयनराजेंचा संताप

सातारा : १७ जून – मराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापू लागलं असल्याचं दिसत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एकीकडे आंदोलन पुकारलं असताना आता उदयनराजे भोसलेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं असून यावेळी सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे असा इशाराच दिला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येत आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झालं आहे अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
“मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येत आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. चाळीस वर्षाचा काळ लोटला तरी मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे आरक्षणाचा ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाज या मागणी पासून कदापि मागे हटणार नाही. जसे इतर समाजाला आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे यात शंका नाही,” असं उदयनराजे यांनी पत्रात म्हटलं आहे.
पुढे ते म्हणतात की, “आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे. त्यामुळे दूध का दूध पानी का पानी होईल. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात अमलात येईपर्यंत समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी. जेणेकरून समाजाला तात्पुरता दिलासा मिळेल. त्याकरिता खालील मागण्या आपणासमोर मांडत आहे. किमान पुढची पावले उचलताना मराठा समाज आश्वस्त होईल अशी सरकारची भूमिका असली पाहिजे”.
“किमान पुढची पाऊलं उचलताना मराठा समाज आश्वस्त होईल अशी सरकारची भूमिका असली पाहिजे. विशेषत: न्या. भोसले समितीने ज्या काही बाबी सुचवल्या आहेत त्यानुसार तातडीने पुढची पावले उचलली गेली पाहिजेत. तसेच राज्य मागासवर्ग आयोगात मराठा आरक्षणाचा प्रश्न समजणारे तज्ज्ञ समाज सदस्यांचा समावेश करून त्यांचे उपगट तयार करून न्या भोसले यांनी जे ‘टर्म्स अँड रेफरन्स’ सांगितले आहे त्याप्रमाणे एम्पिरिकल डेटा तयार करावा. या बाबी त्वरित झाल्या पाहिजे हे करीत असताना समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यावर तात्पुरता उपाय म्हणून खालील मागण्या तातडीने मंजूर कराव्यात,” असंही त्यांनी पत्रात नमूद केलं.

Leave a Reply