सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

अपहरण

नायजेरिया – “हॉटेल फेबसन” अबुजा. एक त्री- तारांकित हॉटेल. इथे तीन बेडरूम चा एक सुट माझ्यासाठी आणि कोणी येणारा – जाणारा म्हणजे आमचा “जनरल मॅनेजर” साठी आम्ही दोन वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतला होता.
सभोवतालचे वातावरण एकदम मस्त. सकाळी बाहेर हिरवळीवर कॉफी पित पित, दिवसाचा आराखडा ठरवायचा आणि मग कामाला लागायचे ही दिनचर्या.
“मिस नायजेरिया” चे संपुर्ण शुटिंग ह्या हॉटेल ला झाले होते. अतिशय आगळा वेगळा अनुभव. जे ग्लॅमर आपण दूरदर्शन वर अनुभवतो त्या पेक्षा कितीतरी पटीने ग्लॅमर बघण्याची अनुभूती प्रत्यक्ष शुटिंग बघताना येते.
आळसावलेली रविवारची सकाळ. आरामात ८.३०-९ वाजता कॉफी पित बसलो होतो. एव्हरेस्ट ट्रान्समिशन चा व्हाईस प्रेसिडेंट “सरकार”चा फोन आला. ब्रदर मै आज पहुच रहा हू, खाना साथ मे खाएंगे.
आपला बंगाली बाबू मोशाय “सरकार”. एका मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट. अबुजा ला भारतातून आला की ह्याचा मुक्काम माझ्याकडे. आला की त्याचे टेंडर वगैरे चे काम आटोपले ८-१० दिवसात परत भारतात, असा साधारण कार्यक्रम. त्यात फारसा बदल होत नसे.
एक दिवस दुपारी घाई घाई ने मला लगेच त्याचे “लागोस” चे तिकीट माझ्या ट्रॅव्हल डेस्क कडून करायला लावले. मी करून दिले. म्हटले यार लागोसला तर कधी जात नाही, तो म्हणाला ब्रदर आल्यावर सगळे सांगतो. माझे काम संपले आहे, माझे जाण्याचे उद्याचे तिकीट सुद्धा मी चार दिवस पुढे करायला, माझ्या कंपनीला सांगितले आहे. असे म्हणून सरकार दोन चार कपडे एका छोट्या बॅग मध्ये भरून, नजरेआड झाला सुद्धा.
चार दिवस तर कामा कामात कसे निघून गेले कळले नाही. संध्याकाळी घरी आल्यावर म्हटले अरे अजून सरकार आला नाही, ह्माने तिकीट तर अबुजा वरुन केले आहे. त्याला फोन केला. टिपीकल बंगाली फोनमध्ये म्हणाला “ब्रॉदर चाॅर दिन और, अबुजा आता हू..
गेल्याच्या आठ दिवसानंतर सरकार अबुजाला आले. खुशीत होता.
मी विचारायच्या आधीच बोलता झाला. माझा भाचा शुभांकर मुखर्जी – डांगोटे कंपनीत कामाला आहे. डांगोटे कंपनी म्हणजे नायजेरियाचा “मुकेश अंबानी” प्रचंड श्रीमंत, राजकारणात त्याचा वट आणि सर्व लोकांत त्याचे उठणे बसणे.
तर एके दिवशी सायंकाळी काम संपल्यानंतर हा शुभांकर आपल्या कारची वाट पाहत आॅफिसच्या बाहेर आणि कंपाऊंड वॉल च्या आत उभा होता. कंपनीचे मेन गेट सतत गाड्या बाहेर जातात म्हणून सताड उघडे. तेवढ्यात शुभांकरला फोन आला आणि फोनवर बोलता बोलता तो फाटकाच्या बाहेर, रस्त्यावर आला. आणि जसा तो रस्त्यावर आला एक कार त्याच्या बाजुला थांबली, दोन हट्टेकट्टे गडी त्यातून उतरले, शुभांकरला उचलले, गाडीत टाकले आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तो पसार झाले. शुभांकर मुखर्जी चे अपहरण करण्यात आले.
नायजेरियात अपहरण, किडनॅप करणे हा प्रकार गुन्ह्यात कमी आणि धंद्यात जास्त गणल्या जातो. पोलिस पासून सगळेच ह्यामध्ये आपला फायदा शोधत असतात.आणि अर्थात ज्याचे अपहरण केल्या गेले असते, त्याचे आयुष्य पुर्णपणे मोबदल्यात ठरणा-या अटींवर आणि अपहरणकर्त्यांच्या नियतवर अवलंबून असते. त्यातल्या त्यात जर अपहृत व्यक्ती जर बाहेरच्या देशातील असेल तर सुटकेची किंमत काही मिलीयन डॉलर मध्ये सुद्धा जाऊ शकते.
तर त्यानंतर शुभांकरचे डोळे बांधल्या गेले, गाडीमध्येच त्याचे हातातील फाईल, मोबाईल, खिशातील पाकिट, वगैरे वगैरे सगळे अपहरणकर्त्यांनी आपल्या कब्जात घेतले. आणि डोळ्याला पट्टी, तोंडात बोळा अशा स्थितीत गाडी धावत होती.
काही वेळाने गाडी थांबली, शुभांकरला गाडीतून व्यवस्थित उतरविण्यात आले. त्याची रवानगी एका अंधाऱ्या खोलीत करण्यात आली. त्याला पिण्यासाठी पाणी आणि स्नॅक्स देण्यात आले. डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली. हुश्श्श sssssss आता अपहरणकर्ते, थोडे स्वस्थ झाले. अपहरण यशस्वी.
आता त्यांनी शुभांकरचे पाकिट उघडले तर त्यात त्याचे “डांगोटे” कंपनीचे व्हिजीट कार्ड. अपहरणकर्ते तर लॉटरी लागल्याच्या जल्लोषात नाचायला लागले. एक परदेशी माणसाचे, डांगोटे कंपनीच्या माणसाचे अपहरण, म्हणजे एक मोठा मासा गळाला लागला होता.
त्यांनी लगेच सांगितले की तुला जे जे खायचे आहे, दारू प्यायची आहे अजून जे काही पाहिजे, सांगत जा आम्ही सगळं काही बिनधोक पुरवू. काळजी करू नकोस. पण जर आम्हाला आमची रक्कम मिळाली नाही किंवा काही दगाफटका झाला तर तुला गोळी घालून ठार करू.
झालेल्या प्रकाराने भेदरलेला शुभांकर मुखर्जी आणिक थरथरायला लागला.
इकडे अपहरणकर्त्यांनी कंपनीमध्ये फोन लावला आणि दिवसा मागून एक एक दिवस शुभांकर मोजायला लागला. जीवन “बोलणी” मध्ये अडकलेले, घरचे आई वडील, बायको पोरं सर्वांचे चेहरे समोर दिसताहेत, आठवणी येताहेत, विचारांचं काहूर पेटलेल्या मनात गर्द अंधारात झाकोळलेलं भविष्य आणि त्यात मेंदुच्या चिथड्या चिथड्या करणारा एकांत.
शुभांकर ने सांगितले की त्या दिवसात मी एका सफरचंदा पलिकडे काही खाऊ शकलो नाही. रोज एक सफरचंद म्हणजे माझे दोन वेळचे जेवण होते.
इकडे अपहरणकर्ते आणि डांगोटे कंपनी, दोघांत बोलणी सुरू होती. अपहरणकर्ते २.५ मिलीयन डॉलर च्या खाली ऐकायला तयार नव्हते आणि धीरोदात्त डांगोटे कंपनी पैसा आणि कर्मचारी वाचविण्याच्या खेळीत, माईंड गेम खेळत अपहरणकर्त्यांची किंमत कमी करून एक एक दिवस वाढवीत होती.
डांगोटे कंपनीची अपहरणाची ही काही पहिली वेळ नव्हती आणि अपहरणकर्ते, ह्या अजस्त्र कंपनीशी फार काळ पंगे घेऊ शकणार नव्हते.
पण ह्या सर्व गोष्टीत अनभिज्ञ शुभांकर, एक दिवस गेला – बोलणी फिसकटली, बहुतेक बोलणी फिसकटली असावीत असे समजून जीवाच्या विवंचनेत, आसवांच्या गर्दीत हरवून जायचा. बहुदा मरण जवळपास फे-या मारतंय, असा भास व्हायचा त्याला. कारण बाहेर ची परिस्थिती कळण्याचे सारे मार्ग खुंटलेले. जे काही खेळ ते फक्त मनाचे. मन चिंती जे वैरी न चिंती.
१ नाही २ नाही ५ नाही तब्बल ७ दिवस गेले, अपहरकर्त्यांचा धीर सुटु लागला. जास्त दिवस अशा परिस्थितीत घालवणे म्हणजे संपूर्ण आखलेली योजना, फिसकटली जाऊन जेलची हवा – ही शक्यता नाकारता येवु शकत नव्हती. आणि सातव्या दिवशी सहा लाख डॉलर सुटकेची किंमत दोन्ही बाजूंनी मान्य केल्या गेली आणि आठव्या दिवशी शुभाकरला डांगोटे कंपनीच्या हवाली केल्या गेले. सात दिवसांत सात वर्षांसारखे कष्टमय, आयुष्य भोगलेला शुभांकर, बाहेर आल्यावर डोळ्यावर हात ठेवून किलकिल्या डोळ्यांनी सुर्याची किरणे अनुभवत होता. आणि सरकार सात दिवस त्याच्या सेवेत लागोस शहरात आला होता.
सरकार म्हणाला त्याला ४-५ दिवस तर धक्क्यातून सावरायला लागले. आई, वडील, बायकोशी फोन वर बोलताना तो तोंडानी बोलुच शकला नाही, नुसता फोन कानाला लावायचा आणि घळघळ ओघळणारे त्याचे अश्रू बोलायचे नी मी फक्त कॉमेंट्रेटरचे काम करायचो, फोनवर. आपण ह्या सगळ्या लोकांना परत याची देही याची डोळा पाहू याचसाठी ओघळणारे आनंदाश्रु. सतत सात दिवस मरणाच्या दारात बसून, अंती सुटका झालेला आनंद, शब्दात व्यक्त करुच शकत नाही.
सरकार म्हणाला सात दिवस त्याला माणसात आणला आणि काल आॅफिसने त्याला एक जण बरोबर देत भारतात पाठवला. त्याला रवाना केले आणि मी इकडे अबुजाला आलो.
नायजेरियात अपहरण होतात हे ऐकून होतो, मात्र अगदी जवळच्या माणसाकडुन प्रत्यक्ष आखो देखा हाल पहिल्यांदाच अनुभवत होतो.
भगवंता अशी वेळ कोणावरही येवू देवु नकोस, ही तुझ्या चरणी प्रार्थना.

भाई देवघरे

Leave a Reply