नागपूर : १७ जून – गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती ही गेल्या निवडणुकीतच होती. शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपने केला आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांनी कुणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. पण जाणीवपूर्वक आणि जाणीवपूर्वक सांगतो, विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वीच सेना-राष्ट्रवादीची युती झाली होती. फडणवीसांचा प्रभाव वापरून अधिकाधिक जागा निवडून आणा आणि पळून या. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद करा, असं आधीच ठरलं होतं. तसा अजेंडा तयार करण्यात आला होता. लपून अजेंडा तयार करण्यात आला होता. पूर्वी छुपी युती केली होती, आता उघड केली आहे. तुम्ही कुणाशीही युती केली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
आम्हाला कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना ही पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. भाजपच्या पाठित खंजीर खुपसला आहे. शिवसेनेने महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. त्यामुळे जनता शिवसेनेला उभं करणार नाही, असंही ते म्हणाले.
आता आगामी निवडणूकीत सेना – राष्ट्रवादी एकत्र लढली तरीही काहीही परिणाम नाही. आम्ही निवडणुकीच्या राजकारणातून शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही, असं सांगतानाच आगामी सर्व निवडणुका जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.