नागपूर : १७ जून – वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून एका सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दिनेशकुमार यादव (३०) रा. भोपाळ या वैज्ञानिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित २८ वर्षीय तरुणी ही पुणे जिल्ह्यातील बारामती येथील राहणारी आहे. तरुणी ही वर्धा मार्गावरील एका शासकीय संस्थेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कामाला आहे. दिनेशकुमार हे प्रशिक्षणासाठी नागपूरला आले आहेत. ५ जून रोजी दिनेशचा वाढदिवस होता त्यामुळे त्यांनी वर्धा मार्गावरील हॉटेल किंग्स येथे पार्टी आयोजित केली होती. वाढदिवसाच्या पार्टीला आपल्या सहकार्यांना आणि तरुणीला देखील बोलविले होते. रात्री ९.३० च्या सुमारास पार्टी संपल्यानंतर दोघेही तरुणीच्या दुचाकीने घरी येत होते. त्यावेळी तरुणी दुचाकी चालवित होती. खापरी सर्व्हिस रोड तृप्ती हॉटेल ते चिंचभवन चौक दरम्यान मागे बसलेल्या दिनेशने तिचा दोनदा विनयभंग केला. त्यामुळे तरुणी घाबरली. तरुणीने ही माहिती आपल्या सहकार्यांना दिली. सहकार्यांनी तिला धिर दिल्यानंतर ती सावरली. त्यानंतर तिने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेशवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.