मुंबई : १७ जून – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने कधी स्वबळाची भाषा केली नाही असं म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी भविष्यात महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली तर चमत्कार होईल, असं मतही व्यक्त केलं आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्वबळावर लढण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त करणाऱ्या पक्षांबद्दल राऊतांनी भाष्य केलं. भाजपा, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. “महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र लढावं लागेल. आम्ही स्वबळावर लढू असं शिवसेना आणि राष्ट्रवादीपैकी कोणीही म्हटलेलं नाहीय. भविष्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील दोन पक्ष एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल,” असं राऊत म्हणाले.
आजच्या सामनाच्या अग्रलेखामधूनही शिवसेनेने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगवला आहे. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारेही आले नाहीत, नुसतं बोलून व डोलून काय होणार?, असं अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. भाजपा आणि काँग्रेस स्वबळावर लढत असेल तर महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष राहतात. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे असा सूचक इशारा शिवसेनेने सामना संपादकीयमधून दिला आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. एका बाजूला राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्दय़ाने जोर धरला आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. धनगरांना वेळीच आरक्षण मिळाले नाही तर पंढरपुरातील विठोबा माऊलीची महापूजा रोखण्याची भाषा सुरू झाली आहे. ‘ओबीसी’चे पुढारीही रस्त्यांवर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात कोरोनाचा धुमाकूळ पूर्णतः थांबलेला नाही. या परिस्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
“महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे २०२४ साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.