उद्धव ठाकरेंनी केले राज्यपाल कोश्यारी यांचे अभिष्टचिंतन

मुंबई : १७ जून – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
दरम्यान, मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सर्वात आधी राजभवानावर पोहोचले होते. मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी 9.30 ला राजभवनावर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहेत. मात्र ते शिवसेनेचे संकटमोचक किंवा यशस्वी मध्यस्थ म्हणून काम केल्याचं यापूर्वी अनेकवेळा दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील संबंध ताणलेले असताना, मिलिंद नार्वेकर आणि राज्यपाल यांची आधी भेट होणं याला विशेष महत्व आहे. मिलिंद नार्वेकर हे 9.30 च्या आसपास राजभवनावर गेल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या भेटीची वेळ निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री 12.30 च्या सुमारास राजभवनावर पोहोचले आणि त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, त्याच्या काही वेळ आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारींना शुभेच्छा दिल्या.
जरी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध ताणलेले असले, तरी मिलिंद नार्वेकर यांचे आणि राज्यपालांचे संबंध चांगले असल्याचं गणेशोत्सवकाळात दिसलं होतं. कारण स्वत: राज्यपाल मिलिंद नार्वेकरांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. आता मिलिंद नार्वेकर हे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील कटुता दूर करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply