संपादकीय संवाद – नानाभाऊंची मुख्यमंत्री पदाची वाटचाल खडतरच

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा नुकतीच जाहीर केली आहे. यापूर्वी त्यांनी राज्यात काँग्रेस स्वबळावर लढेल आणि २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करेल असेही घोषित केले होते. त्यांच्या या दोन्ही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या निमित्ताने पंचनामा परिवाराच्या वतीने नानाभाऊंना मुख्यमंत्री पदासाठी खूप खूप शुभेच्छा देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. नानाभाऊ हे विदर्भातील एक दबंग व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात धान उत्पादक शेतकऱ्यांवर राज्यसरकारने केलेल्या अन्यायामुळे व्यथित होऊन नानाभाऊंनी २००८ साली आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिंगावर घेत त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे एक आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख झाली आहे. याच प्रतिमेमुळे पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
राजकारणात सक्रिय होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छा असते. त्यात वावगे काहीही नाही त्यामुळे नानाभाऊंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणे यात गैर काहीही नाही, मात्र प्रश्न आहे तो त्यांच्या काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात एका काळात प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जात होता. आज मात्र तो चवथ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आज महाराष्ट्रात काँग्रेस जणांना मान्य होईल असे कोणतेही राज्यस्तरीय नेतृत्व उरलेले नाही. विधानसभेत ५०च्या घरात आमदार आहेत तर लोकसभेत राज्यातून फक्त १ खासदार काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतो आहे. संघटनात्मक दृष्ट्या देखील काँग्रेस पूर्णतः ढेपाळलेली आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. त्यातही सर्वच लहान मोठ्या नेत्यांमध्ये परस्परात भांडणे हेवेदावे सुरूच आहेत. अश्या परिस्थितीत २०२४ पर्यंत काँग्रेस पक्ष आपली ताकद किमान तिपटीने कशी वाढवणार याचा विचारही नानाभाऊंना करावा लागणार आहे.
आज महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकारणातील चाणक्य म्हणूनच ओळखले जातात. महाराष्ट्रात काँग्रेसची पद्धतशीर वाट लावण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचा सामना करून पुढे कसे जायचे हे नियोजन नानाभाऊंना करावे लागणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना आणि सगळ्यात शेवटी भाजप या पक्षांचेही आव्हान नानाभाऊंसमोर राहणार आहे. ही सर्व आव्हाने नेस्तनाबूत करीत नानाभाऊंना १४५विधानसभा सदस्यांचे लक्ष्य गाठायचे आहे. आजतरी ते कठीण दिसते आहे.
तरीही राजकारणात कसेही आणि काहीही चमत्कार होऊ शकतात तसाच चमत्कार होईल आणि आपण मुख्यमंत्री बनू असा नानाभाऊंचा आशावाद दिसतो आहे. अर्थात समोरची वाटचाल खडतर आहे हाच इशारा नानाभाऊंना शुभेच्छा देतांना आम्हाला द्यायचा आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply