मुंबई : १६ जून – राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मुद्यावर महाविकासाआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. यावर आता भाजपा नेते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम..” असा इशारा अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे शिवसेनेला दिला आहे.
या अगोदरही भातखळकर यांनी या मुद्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे. “सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!,” असा इशाराच त्यांनी दिलेला आहे.
याशिवाय, लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही,” असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच “शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे,” असंही भातखळकरांनी सांगितलेलं आहे.
तर, जनतेच्या पैशातून मंदिर उभारलं जात असल्याने लोकांना सत्य काय ते समजलं पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी देखील या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी केलेली आहे.
आरोपांना उत्तर देताना, खुल्या बाजारातील किमतीपेक्षा कमी दराने ट्रस्टने जमीन खरेदी केली असून, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप होत असल्याचा दावा ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी केला आहे.
तसेच, या संपूर्ण वादावर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केंद्र सरकारला अहवाल पाठविला आहे. ट्रस्टने सर्व आरोपांना विरोधी पक्षांचा कट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार व्यतिरिक्त ट्रस्टने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही अहवाल पाठविला आहे. ज्यामध्ये जमीन खरेदीसंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे आणि किंमती कशा वेगळ्या आहेत हे स्पष्ट केले आहे.