महापालिकेच्या बसेस सीएनजीवर परावर्तित करण्याची धीमी गती

नागपूर : १६ जून – शहर प्रदूषणमुक्त व्हावे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला त्यांच्या डिझेलवर चालणाऱ्या शहर बसेस सीएनजीवर परावर्तीत करण्याच्या सूचना दोन वर्षापूर्वी दिल्या होत्या. मात्र या कामात महापालिके ची गती अतिशय संथ असून आतापर्यंत के वळ ३८० पैकी ७८ बसेस सीएनजीवर परावर्तीत करण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडे एकूण ४६५ बसेस असून त्यापैकी ३८० बसेस सीनएजीवर परिवर्तीत करण्याचे नियोजन होते. पहिल्या टप्प्यात १७३ आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित बसेस सीएनजीवर येणार होत्या. मात्र आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील केवळ ७८ बसेस परिवर्तीत करण्यात आल्या. विशेष म्हणजे, डिझेलवरील बसेस सीएनजीवर आणण्यासाठी महापालिकेचा निधी खर्च होणार नव्हता. ही जबाबदारी बस सेवेचे संचालन करणाऱ्या कंत्राटदार कंपन्या करणार होत्या. मात्र तीन महिन्यापासून या कं पन्यांना महापालिके ने पैसे दिले नसल्याने त्यांनी हे काम थांबवले.
शहरातील सर्व बसेस सीनएजीवर परावर्तीत करण्याचा निर्णय महापालिकेने गडकरी यांच्या सूचनेनुसार घेतला होता. परिवहन विभागाचे तत्कालीन सभापती बंटी कुकडे यांनी याबाबतचा प्रस्ताव मार्गी लावत कामाला सुरुवात केली होती. मात्र कु कडे यांच्यानंतर सभापती झालेल्या बाल्या बोरकर यांच्या कार्यकाळात या योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आता परिहवन समितीची जबाबदारी पुन्हा बंटी कुकडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र अधिकृतरित्या त्यांची निवड झालेली नाही. त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अर्थसंकल्पात या कामासाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यावर या कामाकडे लक्ष घालू. ते थांबले असेल तर याबाबत प्रशासनाला विचारणा केली जाईल.
डिझेलवर चालणाऱ्या बसेसमुळे होणारे प्रदूषण आणि इंधन खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेऊन गडकरी यांच्या पुढाकारातून महापालिकेने ग्रीन बस सुरू केली होती. तिचे देशभर कौतुक झाले. मात्र महापालिकेने बस संचालन करणाऱ्या स्कॅनिया या कंपनीचे पैसे थकवल्याने त्यांनी ही बस परत नेली. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली. पाच बसेस शहरात धावू लागल्या होत्या. ४० बसेस पुन्हा येणार होत्या. मात्र दोन वर्षापासून हा प्रस्ताव केवळ कागदावर आहे.

Leave a Reply