मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार दोषी – प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : १६ जून – खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सहभागी झाले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योग्य वेळी भूमिका न घेतल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकल नाही. यासाठी दोन्ही सरकारे दोषी आहेत, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मूक आंदोलनात सहभागी होताना प्रकाश आबेंडकर यांनी आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी दोराय स्वामींच्या निवाड्याचा आवर्जून उल्लेख केला. हा निवडा पुन्हा पाहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळीच भूमिका न घेतल्यानेच हा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असा आहे. मी ही भूमिका घेतली होती आणि ती पटवून देण्याचाही प्रयत्न केला होता. आता मात्र माझी भूमिका सगळ्यांना पटत असल्याचे दिसत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे, असे आंबेडकर म्हणाले.
यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने सुरुवातीपासूनच प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत, त्या पर्यायांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे आंबेडकर म्हणाले. आज मराठा समाजाच्या मूक आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्याली लागलेली आहे. मराठा आरक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न सोडवला गेला पाहिजे. याबरोबरच ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न देखील सरकारने सोडवायला हवा असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Reply