बिहारच्या लोकजनशक्ती पार्टीत पडले दोन गट

नवी दिल्ली : १६ जून – बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. त्यानंतर चिराग पासवान यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून देखील हटवण्यात आल्याचं समोर आलं. मात्र चिराग पासवान यांनी नंतर या पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. त्यामुळे पक्षात आता मोठी फूट पडली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र देखील पाठवलं आहे.
चिराग यांनी पत्रात म्हटले आहे की, “पक्षाचा संसदीय दलाचा नेता म्हणून पशुपती कुमार यांना मान्यता देण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार केला जावा. हा निर्णय पक्षाच्या धोरणाप्रमाणे नाही. पक्षाचा अध्यक्षच संसदीय दलाच्या नेत्याची निवड करू शकतो.” तसेच, चिराग यांनी लोकसभा अध्यक्षांकडे अशी विनंती देखील केली आहे की, लोजपाचा संसदीय दलाचा नेता म्हणून त्यांच्या नावाने परिपत्रक काढल जावं.
या अगोदर काल चिराग पासवान यांनी एक भावूक ट्विट केलं होतं. “वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र अयशस्वी ठरलो. पक्ष आई समान आहे आणि आईला धोका नाही दिला पाहिजे. लोकाशाहीत जनताच सर्वकाही आहे, पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो. एक जुनं पत्र सार्वजनिक करतो आहे.” असं चिराग यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशुपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत.
मंगळवारी सकाळी लोजपाच्या पाच खासदारांनी पशुपती कुमार पारस यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत थेट पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांना अध्यक्षपदावरून हटवल्याचं जाहीर केलं होतं. त्यापाठोपाठ पशुपती कुमार पारस यांची पक्षाच्या लोकसभेतील नेतेपदी निवड देखील केली. पण यामुळे संतप्त झालेल्या चिराग पासवान यांनी थेट या पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. यानुसार, स्वत: पशुपतीकुमार पारस, चौधरी मेहबूब अली कासर, चंदन कुमार, वीणा देवी आणि प्रिन्स राज या पाच जणांना पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Leave a Reply