अयोध्येत राममंदिर उभारण्या प्रकरणात करण्यात येणाऱ्या जमिनीच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी करून देशभरात एकच खळबळ उडवून दिलेली आहे. मंदिर न्यासाने या प्रकरणात काहीही अनियमित नसल्याचे स्पष्ट करत विरोधकांचा कट असल्याचा आरोप केला आहे. एकूणच या मुद्द्यावर आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.
अयोध्येत वादग्रस्त ठरलेली वस्तू ही राममंदिराचीच वास्तू होती आणि त्या ठिकाणी राममंदिराच उभारले जावे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र हा निवडा ७० वर्ष प्रलंबित होता हेदेखील इथे नमूद करणे गरजेचे आहे. मोगल आक्रमकांनी या देशात आक्रमण केल्यावर इथली श्रद्धास्थाने नेस्तनाबूत करीत त्याठिकाणी मशिदी बांधल्या. अयोध्येतही नेमके तेच घडले. बाबराने राममंदिर उध्वस्त करून त्याठिकाणी मशीद बांधल्यामुळे त्या मशिदीला बाबरी मशीद हे नाव दिले गेले. हा इतिहास आता न्यायालयानेही मान्य केला आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही हिंदुविरोधी हिंदूंनीच या देशात परधर्मियांचे लांगुलचालन करीत हिंदूंना दाबण्याचा कार्यक्रम निष्ठापूर्वक राबवला. परिणामस्वरूप हा मुद्दा गेली अनेक वर्ष रेंगाळत राहिला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर तिथे राममंदिर उभे होते आहे मात्र, विघनसंतोषी लोकांना आजही ते मान्य नाही ते नवेनवे मुद्दे शोधून काढत राममंदिर उभारणीला अपशकुन कसा करायचा हा प्रयत्न प्रत्येक टप्प्यावर करत असतात. मध्यंतरी राममंदिरासाठी निधी सनाकलनाचा कार्यक्रम हाती घेतला गेला. यानिमित्ताने देशातील प्रत्येक नागरिकाला या मंदिर उभारणीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होता. मात्र त्यालाही विरोध केला गेला. तरीही देशातील रामभक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला.
यामुळेच संतप्त झालेल्या रामद्रोहि मंडळींनी हा मुद्दा उचलल्याचे दिसते आहे. त्यात तथ्य नाही असेही म्हणता येणार नाही. राममंदिर उत्तर प्रदेशातच होते आहे आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका २०२२ मध्ये होऊ घातलेल्या आहे. या पार्श्वभूमीवर हे राजकारण केले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. राममंदिर उभारून होईपर्यंत इतकेच काय तर राममंदिराच्या उभारणी पूर्ण झाल्यानंतरही हे विघनसंतोषी असे मुद्दे उपस्थित करत राहणार आहेत. शेवटी रामभक्तांनी त्याला किती प्रतिसाद द्यायचा हे ठरवायचे आहे.
रामभक्तांना अयोध्येत मंदिर हवे आहे अश्यावेळी त्यांनी या विघ्नसंतोषी मंडळींना त्यांची जागा दाखवून द्यावी या देशात बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांना धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास तो महागात पडेल हे रामभक्तांनी जाणवून देण्याची वेळ आता आली आहे.
अविनाश पाठक