कामठीत आढावा बैठकीत झालेल्या चकमकीवर दोन्ही पक्षांचे स्पष्टीकरण

नागपूर : १५ जून – कामठी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीदरम्यान भाजपचे आमदार टेकचंद सावरकर आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यात शाब्दिक चकमक उडल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. त्यानंतर मंगळवारी दोन्ही पक्षांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यात मंत्री केदार यांनी उचित भाषेचा वापर केला नसल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला, तर काँग्रेस नेते सुरेश भोयर यांनी आमदार सावरकर सभा उधळण्याच्या हेतूने आढावा बैठकीत आले होते, असा आरोप केला.
शासकीय विभागाची आढावा बैठक घेण्याची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची असताना मंत्री सुनील केदार कोणत्या अधिकारांतर्गत आढावा बैठक घेतात, असा सवाल कामठी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री केदार की राऊत, असा खोचक प्रश्नही सावरकर यांनी उपस्थित केला. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तर, गोंधळ घालण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न आमदार टेकचंद सावरकर यांच्या मार्फत करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते सुरेश भोयर यांनी केला.
सोमवारी शासकीय विभागाच्या आढावा बैठकीत अपमानजनक वागणूक दिल्याचा कारणावरून भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी संताप व्यक्त करीत बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या बैठकीत मंत्री सुनील केदार यांनी उचित भाषेचा वापर केला नसल्याचाही आरोप सावरकर यांनी यावेळी केला. या विरोधात विधानसभेत सुनील केदार यांच्या विरोधात हक्क भंगाची नोटीस देणार असल्याचे सावरकर यांनी सांगितले. सोबतच बैठकीत बाचाबाची करणारे काँग्रेस नेते सुरेश भोयर यांच्याविरुद्ध जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांत गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती टेकचंद सावरकर यांनी दिली.
सुरवातीला आमदार टेकचंद सावरकर यांनी, तर नंतर काँग्रेस नेते सुरेश भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन आप-आपली बाजू मांडली. आयोजित करण्यात आलेली बैठक ही प्रामुख्याने नगरसेवक व सरपंच यांच्यासाठी होती. ज्यामुळे सरपंच व नागरसेवकांना आधी बोलू दिले जाते. सावरकर यांच्याशी कुठलाही वैयक्तिक वाद नसून सावरकर यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार ऐकण्यास तयार नसल्याचे सुरेश भोयर यांनी सांगितले. सोबतच आमदार सावरकर यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरली नसल्याचा दावा देखील सुरेश भोयर यांनी केला.

Leave a Reply