शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

पुणे : ११ जून – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल माहिती देताना पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं पवार म्हणाले.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, प्रशांत किशोर हे सिल्वहर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघेही बंद दाराआड चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोघेही एकत्र जेवण घेणार आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे या भेटीची मोठी उत्सुकता आहे.
या भेटीत देशातील आणि प्रत्येक राज्यातील राजकीय हवेवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना संकट हाताळण्यात भाजप सरकार अपयशी ठरलं आहे. त्याचा कोणत्या राज्यात भाजपला अधिक फटका बसू शकतो, याची माहिती पवार घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच काँग्रेस, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या अनुषंगानेही चर्चा होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

Leave a Reply