नागपूर : ११ जून – अनेकदा पाठपुरावा करूनही मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करीत नागपूर महापालिकेच्या आसीनगर झोन कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करण्यात आले. उप्पलवाडी एस.आर.ए संकुल विकास समिती व शहर काँग्रेस समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आसीनगर झोनच्या झोनल अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये आंदोलकांनी कचरा टाकून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेच्या घरकुल योजनेंतर्गत मौजा नारी येथे तीन वर्षांपूर्वी एसआर.ए अंतर्गत निवासी संकुल उभारण्यात आले. या ठिकाणी उत्तर नागपुरातील रेल्वे लाईन येथील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, वारंवार तक्रार केल्यानंतर देखील कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केले. उप्पलवाडी एस.आर.ए संकुल विकास समिती आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आसीनगर झोन कार्यालयात आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी देत झोनल अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कचरा टाकून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
उप्पलवाडी एस.आर.ए संकुलमध्ये ये-जा करण्यासाठी पक्का रास्ता, पिण्याचे पाणी, गटार लाईन, पथदिवे अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे, येथील हजारावर नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, परंतु महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. पावसाळ्यात तर येथील नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याचे अनेकांनी सांगितले.