नागपूर : ११ जून – नागपूर शहरातील हिंगणा एमआयडीसी परिसरातून शाळकरी मुलाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज पांडे (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. सुटकेच्या बदल्यात आरोपीने मुलाच्या नात्यातील एकाचे शीर (मुंडके) मागितले होते. रात्री उशिरा मुलाचा मृतदेह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. पोलिसांनी शाहू नामक आरोपीला अटक केली आहे.
नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडकेश्वर खुर्द या गावाच्या शिवारात रात्री उशिरा एका मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने या मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा तो मृतदेह १६ वर्षीय राज पांडे असल्याचा खुलासा झाला. मृतक राजचे काल रात्री उशिरा हिंगणा परिसरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झाले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. राजचे अपहरण झाल्यानंतर आरोपीने राजच्या वडिलांना फोन करून राजला सोडण्याच्या बदल्यात त्यांच्या नात्यातील एका इसमाचे शीर (मुंडके) मागितले होते. पोलिसांनी याप्रकरणी सुरज शाहू नामक एका आरोपीला अटक केली आहे. राजचा खून करण्यामागे काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत असून आरोपी उडवा-उडवीचे उत्तर देत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज पांडे या १६ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच नागपूर पोलीस अलर्ट झाले होते. शहरातील सर्वच पोलीस ठाण्याला यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. एवढचं नाही तर नागपूरच्या शेजारच्या जिल्ह्यांना सुद्धा अलर्ट देण्यात आला होता. राजच्या वडिलांना आलेला फोन कुठून आला होता. यासंदर्भात तपास सुरू होताच पोलिसांना राजचा रक्ताने माखलेला मृतदेह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुडकेश्वर खुर्द या भागात आढळला. त्याचवेळी पोलिसांनी सुरज शाहू नामक आरोपीला वर्धा मार्गावरील बोरखेडी टोल नाक्याजवळून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी सुरज शाहू हा नेमका कोणते काम करतो, त्याचा राजसोबत काय संबंध होता आणि त्याने कोणत्या व्यक्तीचे मुंडके मागितले होते, यासंदर्भात पोलिसांनी खुलासा करण्याची गरज आहे.