कापणी यंत्राला फवारणी यंत्रात केले रूपांतरित – चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्याने केला यांत्रिक जुगाड

चंद्रपूर : ११ जून – पिकावर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पंपाच्या ओझ्यामुळे कंटाळलेल्या एका युवा शेतकऱ्याने कापणी यंत्राला फवारणी यंत्रात रूपांतरित करून पाठीवरील पंपाच्या ओझ्यापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. चंद्रपूर नजीकच्या सुसा या गावातील युवा शेतकरी श्रीकांत एकुडे यांनी हे अतिशय स्वस्त आणि उपयोगी यांत्रिक जुगाड केले असून यामुळे शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैसा वाचणार आहे.
पिकांवर फवारणी करणे हे अतिशय शारीरिक श्रमाचे काम आहे. त्यामुळे या कामासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण जाते. शिवाय सामान्य मजुरांपेक्षा फवारणी करणाऱ्या मजुरांना ज्यादा पैसे देऊन फवारणीचे काम पूर्ण करावे लागते. त्यामुळे हे काम अतिशय खर्चिक सुद्धा आहे. सोबतच उभ्या पिकात फवारणी करणे धोकादायक असल्यामुळे फवारणी नाईलाजाने टाळावी लागते. यामुळे हातचे पीक सुद्धा जाते. हा अनुभव गेल्यावर्षी सोयाबीन पिकाच्या बाबतीत शेतकऱ्यांना आला होता. ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी करणारे यंत्र उपलब्ध आहेत. परंतु हे छोटय़ा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. याला पर्याय म्हणून कापणी यंत्राचे फवारणी यंत्रात रूपांतर करून फवारणीचे काम अतिशय कमी खर्चात करता येते. हे यंत्र बनवण्यासाठी पन्नास लिटरची पाण्याची कॅन, लोखंडी पिंजरा, जुन्या पंपाची बॅटरी, मोटार आणि नळ्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे यंत्र बनवायला फारसा खर्च आला नाही. या यंत्राद्वारे अवघ्या तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये एक एकर फवारणी करता येते. यासाठी फक्त तीनशे मिली पेट्रोलची आवश्यकता असून त्याचा खर्च अंदाजे तीस रुपये एवढा आहे. त्यामुळे हे यंत्र वापरायला अतिशय किफायतशीर व वेळ वाचवणारे आहे. यंत्राचा वापर सोयाबीन, कापूस भाजीपाला पिकांवर करता येतो. याचा सोयाबीन पिकामध्ये सोयीस्कर वापर करता यावा, यासाठी शेतकऱ्याला पट्टा पद्धतीचा अवलंब करावा लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे छोटे कापणी यंत्र उपलब्ध आहे. यांत्रिक जुगाड केल्यास त्यांना व इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येईल.
या फवारणी यंत्राची पाहणी स्वत: राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच सोयाबीनच्या एसबीजी ९९७ या वाणाचे संशोधक सुरेश बापूराव गरमडे यांनी केली असून या यांत्रिक जुगाडाचे त्यांनी कौतुक केले व तसेच हे यंत्र त्यांनी स्वत: बनवून घेतले. या फवारणी यंत्राचे जुगाड करण्यासाठी परिसरातील इच्छुक शेतकऱ्यांना नक्की मदत करू, असे युवा शेतकरी श्रीकांत एकुडे यांनी सांगितले.

Leave a Reply