नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात – निलेश राणे यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : १० जून – एकीकडे चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाघावरून सुरू असलेला कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे आता भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील या सुंदोपसुंदीमध्ये उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाघासंदर्भातल्या केलेल्या विधानावरून निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात. वाघ बकरी नावाचा चहा सुद्धा येतो आणि टायगर नावाचा बाम सुद्धा येतो”, असं निलेश राणे म्हणाले आहेत. त्यामुळे बुधवारी पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेल्या ‘वाघ’ प्रकरणावरून आता दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर निलेश राणेंनी ट्वीटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. “नाक्यावर उभे राहणारे टपोरी पण स्वत:ला वाघ समजतात. बकरी नावाचा चहा सुद्धा येतो आणि टायगर नावाचा बाम सुद्धा येतो. स्वत:ला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते, तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.
“वाघाशी कधी मैत्री होत नाही फार. वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. त्यांना कुणाकुणाशी मैत्री करायची आहे, त्याची यादी त्यांनी पाठवून द्यावी, त्यावर आपण काम करू”, असा टोमणा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देताना मारला होता.

Leave a Reply