नागपूर : १० जून – एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने शेजारी-शेजारी असलेल तीन घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याच्या डोरली भिंगारे गावात घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने जीवतहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
जिल्ह्यातील काटोल तालुक्यात डोरली भिंगारे नावाचे गाव आहे. येथे आज सकाळी ६ च्या सुमारास राधाबाई टूले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडर लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली. पाहता पाहता आग शेजारी राहणाऱ्या विठाबाई टुले, कुमुद नारायण सरोदे यांच्या घरापर्यंत पोहोचली. या आगीत तिन्ही घरं आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
दुर्दैवाने विठाबाई टुले या महिला शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी बियाणे व खत घेण्याकरिता जमा केलेले 50 हजार रुपये जळून खाक झाले आहे. ऐन पावसाळ्यात हे तीन कुटुंब उघड्यावर आले आहेत. त्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.