संपादकीय संवाद – राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा फसलेला प्रयोग ठरू नये

आज १० जून आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा स्थापनदिन साजरा केला जात आहे. १९९९ साली काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या या पक्षाच्या २२ वर्षाच्या वाटचालीबाबत आज माध्यमांमध्ये वेगवेगळे दवे आणि प्रतिदावे केले जात आहेत.
मुळात काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करत असताना जी करणे दिली जात होती, त्या कारणांची पूर्तता झाली काय? असे बघितल्यास उत्तर नकारार्थीच मिळते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना झाली. त्याआधी शरद पवार पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर हे तीन नेते काँग्रेसमधून बाहेर निघाले किंवा बाहेर काढले गेले होते. १९९१ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या विधवा पत्नी सोनिया गांधी या राजकारणापासून दूर होत्या. मात्र १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोनियाजी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. त्यानंतर १९९९ ला आलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये सोनियाजी पक्षाच्या नेत्या म्हणून पुढे आल्या आणि पक्ष सत्तेत आल्यास त्या पंतप्रधान बनतील अशी चिन्हे दिसू लागली. त्यावेळी शरद पवार हेदेखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र सोनियाजी पुढे आल्यास आपला पत्ता कटेल या भीतीने पवारांनी त्यांना विरोध केला परिणामी त्यांना पक्षातून काढले आणि पवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.
नंतरच्या २२ वर्षात ज्या जिद्दीने पवारांनी नवा पक्ष काढला त्या तुलनेत त्यांना फारसे काही मिळाले असे दिसत नाही. ज्या काँग्रेसमधून फुटून निघत त्यांनी नवा पक्ष काढला त्या काँग्रेससोबतच अभद्र शय्यासोबत करून त्यांना सत्ता मिळवावी लागली. तिथेही त्यांना दुय्यम स्थान होते. नंतर याच काँग्रेसशी आघाडी करून त्यांना निवडणूक लढवावी लागली. या २२ वारसाच्या काळात पवारांना पंतप्रधानपद मिल्ने तर दूरच पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाची त्यांच्या पक्षाला मिळू शकले नाही. गत २२ वर्षात त्यांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत कायम ५० ते ७५ च्या मध्येच खेळात राहिला महाराष्ट्रातही स्वबळावर सत्ता पवारांचा पक्ष मिळवू शकला नाही आतातर पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून पुरते बाहेर फेकले गेलेले आहेत. राजकीय अभ्यासकांच्या मते पवार हयात आहेत तोवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आहे नंतर या पक्षाचे काही खरे नाही. काही जाणकारांच्या मते आजच सुप्रिया ताईंचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी पवार भाजपशी तडजोड करण्याच्या तयारीत आहेत. हे खरे असेल तर या प्रकरणाचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
हे बघता पवारांचा हा पक्षबदल आणि नवीन पक्षाची स्थापना हा फसलेला प्रयोग आहे असेच म्हणावेसे वाटते. ज्या तडफेने ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते ती तडफ आठवल्यास या घटकेला तरी पवारांच्या हाती फक्त धुपाटणे आले आहे असेच म्हणावे लागेल.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी कठोर आत्मपरीक्षण करायला हवे असे सुचवावेसे वाटते. पवारांनी यापूर्वी १९७८ मध्येही काँग्रेस फोडून समाजवादी काँग्रेस गठीत केली होती. मात्र त्यावेळी त्यांना आधी न मिळालेले मुख्यमंत्रीपदही मिळाले नंतरची ५ वर्ष त्यांना विरोधी पक्षनेता म्हणूनही काम करता आले. १९८७ मध्ये काँग्रेसमध्ये परत गेल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपद, केंद्रात संरक्षणमंत्री आणि नंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते अश्या पदांवर काम करता आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात उपमुख्यमंत्री तर केंद्रात कृषिमंत्री अशी कमी महत्वाची पदे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला स्वीकारावी लागली. असे का होते? नव्या पक्षाचा पुरेसा दबाव का निर्माण करता आला नाही महाराष्ट्रासारख्या राज्यातील एका विभागातला पक्ष अशी प्रतिमा का निर्माण झाली याचा विचार पवारांनी करून भविष्यातील रणनीती ठरवणे हे गरजेचे आहे.
तोपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना हा शरद पवारांचा एक फसलेला प्रयोग म्हणूनच इतिहासात नोंद घेतली जाणार आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply