वाशीम : १० जून – मृग नक्षत्रात जोरदार पाऊस पडून तालुक्यातील काही गावांना पुराचा मोठा फटका बसलेला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्यातील नदी नाले एक झाले असून, अनेक नद्यांना पुर वाहण्यास सुरुवात झाली आहे. ९ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील कोंडोली येथील अरुणावती नदीला मोठा पूर आला त्यामुळे गोंडोली गावातील श्री पितांबर महाराज मंदिराकडे जाणारा पुल पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोंडोली गावातील नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.
श्री पितांबर महाराज मंदिर संस्थान परिसरातील आनंदवाडी भागातील नागरिकांना मानोरा येण्यासाठी आता असोला -हिवरा- कोलार मार्गे फिरून यावे लागणार आहे तसेच गावातील नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पेरणीचे दिवस अगदी जवळ आले असल्याने व त्यातच पूल तुटल्याने नागरिकांसमोर शेती कशी करावी हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या वतीने याकडे तात्काळ लक्ष देऊन पर्यायी मार्ग उभारावा अशी मागणी गावातील तसेच गावाला दर्शना निमित्त जाणार्या भाविक भक्तांकडून आणि कोंडोली येथील रहिवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अरुणावती नदीवर जोगलदरी पासून खाली दिग्रस तालुक्या पर्यंत असंख्य पुले असून, या पुलांची तपासणी तज्ञांकडून होणे गरजेचे असल्याचे मत आता तालुक्यातील नागरिकांमध्ये पहिल्याच पावसाच्या पुरात पूल वाहून गेल्यामुळे होत आहे.