वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मुंबईकरांचा मराठी बाणा !

हे मुंबईवाले लेकाचे कुठून एवढं चांगलं नशीब घेऊन येतात ?
पावसाच्या पहिल्या सरी त्यांना दरवर्षी स्वर्गीयआनन्द देऊन जातात!
लोक गंगास्नान करायला काशी, प्रयागला जातात
पण भारतातल्या तमाम नद्या पहिला पाऊस पडताच यांच्या घरात येतात !
आणि आपला तीर्थप्रसाद देतात !
मग मुंबई राहतच नाही मुंबई
तिची होते चक्क तुंबलेली तुंबई !
लोकलची,बेस्टची चाकं थांबतात,
शाळा कॉलेजची बाकं मुकी होतात !
कार्यालयातले बाबू,गिरण्यातले साबू
कॉलेजची पोरं, रस्त्यावरची ढोरं ,
सारे सारे मस्त रोमँटिक होतात !
दुचाकी, चारचाकी गाड्यासुद्धा
पाण्यात डुंबण्याची मौज लुटतात !
विजेचे खांब,मोठमोठी झाडं, जुन्या कच्या इमारती आडव्या होऊन चक्क
‘ रास्ता रोको ‘चा खेळ करतात !
आणि इतकं दरवर्षी होऊनही
मुंबईकरांचा मोडत नाही ‘कणा ‘ !
पुन्हा पुन्हा ‘ त्यांनाच ‘ निवडून , ते
दाखवतात आपला मराठी बाणा !

            कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply