नागपूर : १० जून – गाडीतून २0 हजार रुपये चोरी गेल्यानंतर घरी काय सांगायचे, या भीतीमुळे एका मुलाने चक्क आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अनंत मुन्ना शुक्ला (वय २५, रा. सूरजनगर, नागपूर) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत शुक्ला याचे मानकापूर हद्दीतील गणपतीनगरच्या टॉवर लाईन रोड, नशेमन सोसायटी, नागपूर येथे फळांचे दुकान आहे. दुकानाच्या सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी एका सुसाईड नोट सापडली. अनंत शुक्ला याने आईला उद्देशून ही नोट लिहिली होती. यात त्याने दुचाकीच्या डिक्कीतून २0 हजार रुपये कोणीतरी चोरून नेले. आता काय करू? तुला तोंड दाखविण्याची माझी लायकी नाही, असा उल्लेख केला.
याप्रकरणी फिर्यादी रोहित मुन्ना शुक्ला (वय २३) यांनी दिलेल्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.