मुंबई : १० जून – मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची कांदिवलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली.
दरम्यान पंतप्रधांनी झालेल्या घटनेवर दुःख व्यक्त करत पंतप्रधान निधीतूनही मृतांच्या वारसाला प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
५ लाख रुपयांची मदत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना देण्यात येईल. अपघात निधीतून ही मदत केली जाणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. रुग्णालयात जखमींना दाखल केलं असून त्यांना मोफत उपचार देणार आहोत, असंही त्या म्हणाल्या.
भाजप नेते प्रवीण दरेकर आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी मालाडच्या मालवणी इमारत दुर्घटनेनंतर या घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेल्या दरेकरांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ही जागा जिल्ह्याधिकारी अखत्यारीतील असून येथे अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे. अनधिकृत बांधकामाविषयी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रव्यवहार करून देखील कोणतीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं प्रवीण दरेकर म्हणालेत.