खून प्रकरणी दाखल याचिकेत विरोधी पक्षनेत्यांची मध्यस्ती याचिका

नागपूर : १० जून – सात वर्षापूर्वी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका हत्या प्रकरणी नागपूरचे वकील सतीश उके यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेसंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी याचिका दाखल केली आहे. उके यांनी त्यांच्या याचिकेत खोटे आरोप करत आपले (फडणवीसांचे) नाव नमूद केले आहे. त्यावरील सुनावणी करताना न्यायालयाने त्यात आपल्याला पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यात यावे आणि आपल्यालाही बाजू मांडू द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी उच्च न्यायालयात केलेल्या मध्यस्थी अर्जाद्वारे केली आहे.
विशेष म्हणजे उके यांच्या याचिकेवर न्यायालयाने काढलेल्या नोटीसमध्ये फडणवीस यांचे नाव नाही. ७ वर्षांपूर्वीच्या या हत्या प्रकरणात नुकतंच वकील सतीश उके यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून मे महिन्यात न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना नोटीस काढल्या होत्या.

सतीश उके यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत येथे एक पत्रकार परिषद घेऊन सात वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप बिनबुडाचे असून उके कोणतेही पुरावे न देता बदनामी करत असल्याच्या कारणाने फडणवीस यांनी उके विरुद्ध मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर उकेंनी नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली. या याचिकेतील आरोप बिनबुडाचे असून त्यावर आपल्याला बाजू मांडू द्यावी, त्यासाठी आपले नाव पक्षकारांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी या मध्यस्थी याचिकेद्वारे फडणवीस यांनी केली आहे.

Leave a Reply