नागपूर : १० जून – नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत पिपळा (डाक बंगला) याठिकाण संतोषनाथ सोलंकी (वय, 52) या व्यक्तीची हत्या करण्यात आली. संतोषनाथ आज (गुरुवार) सकाळी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. अज्ञात मारेकऱ्याचा खापरखेडा पोलीस तपास करत आहेत.
शेतीच्या कामासाठी वापरली जाणारी कुदळ वापरून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मात्र ही हत्या कोणी आणि का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतकाचा खापरखेडा येथे मिल्क शेक व ज्यूसचे दुकान आहे. तसेच मृतकाची बायको मुलांसह 4 महिन्यापासून धापेवाडा येथे राहत आहे. घटनेच्या वेळी संतोषनाथ घरी एकटेच होते. घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे.
संतोषनाथ सोलंकी हे कुटुंबापासून वेगळे राहत होते. त्यांचे कोणासोबत वैर होते का, यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याशिवाय मृतकाच्या परिचित व्यक्तींची आणि नातेवाईकांची विचारपूस करण्याची शक्यता आहे.