यंदा ७ जुनलाच मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आणि पहिल्याच पावसाने राजधानी मुंबईला चांगलेच झोडपून काढले. परिणामी मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली त्यावरून सध्या विरोधकांनी मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला झोडपणे सुरु केले आहे. सामान्य नागरिकही दरवर्षीप्रमाणे यंदाही संताप व्यक्त करीत आहेत.
हा प्रकार मुंबईत दरवर्षी घडतो पाऊस आला की मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी तुंबते रेल्वे रुळावरही पाणी जमा होते त्यामुळे मुंबईची रक्तवाहिनी असलेल्या रेल्वे लोकलची हालचालही थांबते दरवर्षी त्यावर टीका होते. मात्र सुधारणा कधीच होत नाही .
हा प्रकार थांबायला हवा हे नक्कीच त्यासाठी असे का घडते याचाही विचार व्हायला हवा. मुंबई हे समुद्राकाठचे शहर आहे. मुंबईला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. समुद्र म्हणजे भरती आणि ओहोटी हे प्रकार ओघानेच आले. भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस आला तर भरतीच्या पाण्यासोबत पावसाचे पाणीही शहरात येणे स्वाभाविक मानले जाते अर्थात फक्त हेच कारण आहे असे धरून चालता येत नाही मुंबई हे समुद्राकाठचे शहर असल्यामुळे रस्ते वाहतूक हवाई वाहतूक आणि जलवाहतूक या तिन्हींनी मुंबईला जोडले आहे. परिणामी मुंबईला उद्योगधंदे झपाटून वाढले मुंबईत आल्यावर रोजगार हमखास मिळतो याची देशभरात खात्री वाटल्याने संपूर्ण देशातून बेकारांचे लोंढे मुंबईकडे धावणे सुरु झाले. हे लोंढे फार पूर्वीच थांबवले जायला हवे होते. मात्र तसे कधीच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी गेल्या १०० वर्षात मुंबईतील गर्दी सतत वाढतेच राहिली त्याचा परिणाम मुंबईतील नागरी सुविधांवर झाला. मुंबईत आलेल्या नागरिकांना राहायला घरे हवीत म्हणून मुंबईत बहुमजली घरे तयार झाली मात्र त्या तुलनेत नागरी सुविधा वाढल्या नाहीत नागरिकांना राहण्यासाठी घरे बांधायला जागा उरली नाही. त्यावेळी समुद्रात भर घालून घरे उभारली गेली आणि मुंबईतील टेकड्यांवरही वस्त्या उभारल्या गेल्या. याचा परिणाम मुंबईतील नागरी सुविधांचा बोजवारा उडवण्यात झाला.
परिणामी आज मुंबईत पाऊस येतो रस्त्यावर मुसळधार पावसाचे पाणी साचते मात्र पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. समुद्रात भर घातल्यामुळे भरतीच्या लाटा अनेकदा समुद्र किनारी असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये शिरतात. त्या ठिकाणी असलेल्या जलवाहिन्यांवर आधीच नागरी वस्त्यांचा भार असल्यामुळे येणारे पाणी वाहून नेण्यास या जलवाहिन्या अपुऱ्या ठरतात. अनेक ठिकाणी नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे या जलवाहिन्या बुजलेल्या असतात. त्यामुळे समस्येची तीव्रता अधिकच वाढते. मुंबईत असलेल्या नद्यांमध्ये ए पाणी वाहून जाऊ शकते मात्र त्या नाड्यांमध्येही कचरा टाकून नागरिकांनी त्यांची वाट लावलेली आहे. दरवर्षी महापालिका या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी कार्यक्रम हाती घेते त्यासाठी जनतेचा पैसा खर्च होतो मात्र गाळ निघतच नाही. मोकळी मैदाने असली तर पावसाचे पाणी त्यात जिरते मात्र मुंबईतल्या सर्व मोकळ्या जागांवर झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे समस्या अधिकच गंभीर होते.
या सर्व प्रकारांमुळे दरवर्षी पाणी अडते आणि त्याचे पर्यवसान थोड्याही पावसात मुंबईची तुंबई होण्यात झालेले दिसते.
दरवर्षी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नाही तात्पुरती मलमपट्टी तेवढी केली जाते त्याचा परिणाम मुंबईची तुमबी होण्यात झालेला दिसतो.
आज मुंबईत स्थिरावलेले लोंढे तर परत पाठवता येणार नाही मात्र भविष्यात तरी हे लोंढे कसे थांबवायचे हा विचार करावा लागेल त्याचबरोबर विद्यमान परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञ मंडळींच्या नेतृत्वात ठोस असे नियोजन करावे लागेल अश्या प्रकारात राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी दीर्घकालीन आराखडा ठरवावा लागेल.
हे सर्व होण्यासाठी जबर राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे तरच मुंबईची ही दुरावस्था थांबू शकेल.
अविनाश पाठक