शेतकऱ्यांच्या नावे केंद्र सरकार पेट्रोलवर कर वसूल करत आहे – नाना पटोले

वर्धा : ९ जून – शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येक लिटर पेट्रोलमागे पावणेतीन रुपये केंद्र सरकार वसूल करीत आहे. या पैशाचा हिशेब मागण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
वर्धा जिल्हा दौऱ्यावर आले असताना स्थानिक विश्रामगृहात पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनमोहनसिंह सरकार असताना एक रुपये प्रतिलिटर पेट्रोलमागे घेतले जात होते. मोदी सरकारने रस्ते विकासाच्या नावाखाली अठरा रुपये वसूल करणे सुरू केले. असे कर वाढल्यानेच सामान्य जनतेसाठी इंधन दरवाढ असहय़ ठरली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर पावणेतीन रुपये वसूल करणाऱ्या केंद्र सरकारने त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना काय दिले, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आंदोलन केले जाईल. रस्ते विकासाच्या नावे मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सहा हजार कोटी रुपये किंमतीचे रस्ते विदेशी कंपन्यांना बहाल करण्यात आले. या कंपन्यांनी वसुली करणे सुरू केल्यावर सर्वत्र आक्रोश दिसून येईल. ओबीसी घटकांचे सर्वात मोठे नुकसान भाजपने केले आहे. भाजप हाच ओबीसींचा शत्रू क्रमांक एक असल्याचे ओबीसींना कळून चुकले. त्यामुळे भाजपला धडा शिकवल्याशिवाय ते राहणार नाही. मागासवर्गीयांचे घटनादत्त अधिकार अबाधित राहण्याची खात्री काँग्रेसच देऊ शकते. तिसऱ्या लाटेची तीव्र शक्यता असताना तसेच लसीकारण पुरेसे झालेले नसताना ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू करण्यात राज्य शासनाने घाई केली नाही का, या प्रश्नावर उत्तर देताना पटोले काहीसे हडबडले.
त्यांनी केंद्राला दोष देत मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. शेवटी जीव वाचवण्याइतकीच जीव जगवण्याची बाब देखील महत्त्वाचे असल्याचे नमूद करीत ‘अनलॉक’चे समर्थन केले. यावेळी आमदार अमर काळे, महिला काँग्रेसच्या संध्या सव्वालाखे, आमदार अभिजित वंजारी, शेखर शेंडे, हेमलता मेघे, अंबिका हिंगमिरे व अन्य नेते उपस्थित होते.

Leave a Reply